नाशिक प्रकरण : मॅनेजर निदा खान होती दबंग मॅम , ब्रेनवॉश करायची, टीसीएसने घेतली गंभीर दखल...

Foto
नाशिक - शहरातील टीसीएस, बीपीओ कंपनीतील धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणी सर्वात जास्त चर्चा ज्या नावाची होत आहे ती म्हणजे  मॅनेजर निदा खान..सहकारी कर्मचारी तिला दबंग मॅम म्हणून बोलवायचे. ऑफिसमधील तिचा वावर इतका प्रभावशाली होता की तिला सगळेच घाबरायचे. 

एफआयआर मधील आरोपानुसार, निदा खान केवळ एचआरच्या भूमिकेत मर्यादित नव्हती तर ती अशा टीम लीडर्ससोबत नजरेस यायची ज्यांच्यावर महिला कर्मचार्‍यांचा छळ आणि बळजबरीने धर्मांतरासाठी दबाव टाकण्याचा आरोप आहे. ती महिलांना इस्लामी परंपरेनुसार कपडे घालायला, प्रथेचे पालन करायला सांगत होती. ती सल्ला देत नव्हती तर महिला कर्मचार्‍यांवर दबाव आणायची. महिलांनी बुरखा कसा घालायचा हे ती कर्मचार्‍यांना सांगत होती असं समोर आले आहे. नाशिकमध्ये दाखल गुन्ह्यात निदा खानचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. एका संघटित समुहाने महिला कर्मचार्‍यांना कंपनीत टार्गेट केले होते. त्यांच्यावर लैंगिक अतिप्रसंग आणि धार्मिक दबाव टाकला जात होता.

एका पुरुष कर्मचार्‍यानेही तक्रार दाखल केली आहे. ज्यात ऑफिसमध्ये धार्मिक अत्याचार आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला आहे. ७ पुरुष आरोपी एका टोळीसारखे काम करत होते. हे सर्व कर्मचारी कंपनीत जबाबदारीच्या पदावर होते. आपल्या पदाचा गैरवापर करून ते कर्मचार्‍यांवर दबाव आणायचे. महिलांना सारखे बघत राहायचे, त्यांच्यासमोर अश्लील चाळे करायचे. खासगी आयुष्यावर आक्षेपार्ह टीप्पणी करायचे. विरोध केल्यावर अधिक त्रास दिला जायचा असा आरोप या आरोपी पुरुष कर्मचार्‍यांवर आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकारात एचआरची भूमिका संशयास्पद आहे. एका महिला अधिकार्‍याने पीडितेला तक्रार दाखल करण्यास मनाई केली. अशा गोष्टी होत राहतात असं तिला सांगण्यात आले. त्यामुळे अनेक घटना उघडकीस आल्या नाहीत. आरोपींनी एक व्हॉट्सग्रुप बनवला होता. ज्यातून कर्मचार्‍यांना टार्गेट केले जायचे. या ग्रुपमध्ये निदा खानही होती. काही प्रकरणात कर्मचार्‍यांना बळजबरीने नमाज पठण करणे, मांसाहार करायला लावणे, धार्मिक छळ करण्याचा प्रयत्न सुरू होता. एका कर्मचार्‍याला जबरदस्तीने टोपी घालून त्याला नमाज पठण करायला भाग पाडले. त्याचा फोटोही घेतला. महिला कर्मचार्‍यांसोबत लैंगिक छळ केल्याचे समोर आले. आतापर्यंत या प्रकरणी ८ आरोपींना अटक केली आहे. ज्यात ७ पुरुष आणि १ महिला समाविष्ट आहे. निदा खान अद्यापही फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहे. 

कंपनीनेही घेतली दखल
टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांनीही या संपूर्ण प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत हे चिंताजनक असल्याचं म्हटले. या प्रकरणातील सर्व तथ्ये पडताळून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं त्यांनी म्हटलं. सुरुवातीला या प्रकरणात एकच तक्रार समोर आली होती. परंतु कौन्सलिंगनंतर अन्य पीडित महिलाही समोर आल्या. त्यानंतर एका पाठोपाठ एक असे ९ गुन्हे नोंदवण्यात आले. या संपूर्ण प्रकरणात सर्वात महत्त्वाची भूमिका निदा खानची मानली जाते. तिच्या अटकेनंतर आणखी खुलासे होऊ शकतात असं पोलिसांना वाटते. 

ब्रेनवॉश करायची निदा खान
हा प्रकार समोर आल्यानंतर भाजपासह हिंदुत्ववादी संघटनांनी नाशिकच्या कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढत आंदोलन केले. तपासात व्हॉट्सअप चॅटमध्ये इमरान नावाच्या एका व्यक्तीचे नाव समोर आले. जो कथितपणे मलेशियाशी संबंधात आहे. इमरान चिथावणीखोर विधाने करून कर्मचार्‍यांवर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणत होता. या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये  मॅनेजर निदा खान हिचाही समावेश होता.